एक्सक्लुझिव्ह

टेक फॉग: भाजपशी संबंधित सायबर फौजांचे फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ करणारे अ‍ॅप

सोशल मीडिया व एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स ताब्यात घेणारे, उजव्या विचारसरणीचा अतिशयोक्त प्रचार करणारे, ऑनलाइन फौजांद्वारे वापरले जाणारे ‘टेक फॉग’ या अत्याधुनिक अॅप‘चा द वायर’ने केलेला पर्दाफाश.

आयुष्मान कौल आणि देवेश कुमार / 06 जानेवारी 2022

नवी दिल्ली: ‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे अ‍ॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा, स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या, @Aarthisharma08 या निनावी ट्विटर अकाउंटने, एप्रिल २०२० मध्ये ट्विट्सच्या एका मालिकेद्वारे, केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील जनतेच्या धारणांमध्ये बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट या अ‍ॅपपुढे आहे, असेही दावा करणाऱ्याने म्हटले आहे.

या ट्विटर हॅण्डलने टेक फॉग या ‘छुप्या अ‍ॅप’चा उल्लेख केला होता. हे अ‍ॅप ‘रिकॅप्चा कोड्स बायपास’ करून वापरकर्त्यांना ‘टेक्स्ट्स व हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड’ करण्याची क्षमता देते, असेही म्हटले होते. अशा प्रकारच्या अ‍ॅपचा उल्लेख आल्यामुळे ‘द वायर’चे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि प्रस्तुत लेखाचे लेखक, या अज्ञात अ‍ॅपच्या अस्तित्वाचा तपास करण्याच्या उद्देशाने, ट्विटर अकाउंटमागील व्यक्तीपर्यंत पोहोचले.

त्यानंतर झालेल्या संभाषणांमध्ये, स्रोताने असा दावा केला की, ट्विटरवरील ‘ट्रेण्डिंग’ विभाग टार्गेटेड हॅशटॅग्जसह अनधिकृतरित्या ताब्यात घेणे, भाजपशी निगडित अनेकविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे तसेच भाजपवर टीका करणाऱ्या पत्रकारांच्या ऑनलाइन त्रासाचे दिग्दर्शन करणे ही त्याची दररोजची कामे होती. ही सर्व कामे टेक फॉग या अ‍ॅपमार्फत केली जात होती.

भाजपने २०१९ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता कायम राखल्यास गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्याचा वायदा आपले कथित सूत्रधार देवांग दवे यांनी केला होता. देवांग दवे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय सोशल मीडिया सचिव होते. ते सध्या भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापक आहेत. दवे यांनी मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा वायदा पूर्ण न केल्यामुळे आपण ही माहिती उघड करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पुढील दोन वर्षे संभाषणांची प्रक्रिया सुरूच राहिली. या जागल्याने (व्हिसलब्लोअर) केलेल्या आरोपांपैकी कोणत्या बाबींची पडताळणी होऊ शकते आणि कोणत्या बाबींची होऊ शकत नाही याची चाचपणी ‘द वायर’ची टीम या काळात करत होती. याशिवाय अशा प्रकारच्या अ‍ॅपचा सार्वजनिक संवादावर तसेच देशातील लोकशाहीच्या पावित्र्यावर अधिक व्यापक परिणाम कसा होऊ शकतो याचाही तपास सुरू होता.

जागल्याने केलेला प्रत्येक आरोप स्वतंत्र पडताळणीच्या प्रक्रियेद्वारे पडताळून बघण्यात आला. यातून टीमने अ‍ॅपच्या वेगवेगळ्या कार्यात्मकता (फंक्शनॅलिटीज), अ‍ॅप तयार करणाऱ्यांची ओळख आणि अ‍ॅपचा वापर करणाऱ्या संस्था यांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ट्विटर अकाउंटमागील व्यक्तीने एनक्रिप्टेड ईमेल्स आणि ऑनलाइन चॅटरूम्सच्या माध्यमातून अनेक स्क्रीनकास्ट्स आणि स्क्रीनशॉट्स पाठवून, अ‍ॅपच्या फीचर्सची प्रात्यक्षिके दिली. स्रोताने आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी स्वत:ची व आपल्या एम्प्लॉयर्सची पेस्लिप व बँक स्टेटमेंट्सही शेअर केली (ही कागदपत्रे प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर).

स्रोताने ‘द वायर’ला टेक फॉग अ‍ॅपला थेट अॅक्सेस पुरवला नाही. सुरक्षिततेच्या विविध निर्बंधांमुळे हे शक्य नाही असा दावा या व्यक्तीने केला. अ‍ॅपच्या डॅशबोर्डवर लॉगइन करण्यासाठी तीन वन-टाइम पासवर्ड्सची (ओटीपी) आवश्यकता असणे तसेच आस्थापना बाहेरच्यांना प्रवेश (अक्सेस) नाकारणारी लोकल फायरवॉल ही त्याची काही उदाहरणे या व्यक्तीने दिली. मात्र भाजयुमो अधिकाऱ्याला पाठवलेल्या ईमेलद्वारे स्रोत आमच्याशी जोडून घेऊ शकत होता. या अधिकाऱ्याने पाठवलेली कोड स्क्रिप्ट्स टीमला विविध बाह्य साधने व सेवांची ओळख पटवण्यात उपयुक्त ठरली. यांद्वारे टेक फॉग अ‍ॅप होस्ट करणाऱ्या सर्व्हरला जोडून घेणे शक्य झाले. याच स्क्रिप्टद्वारे, ‘द वायर’च्या टीमला हे अ‍ॅप होस्ट करणाऱ्या जिओ-रेप्लिकेटेड सर्व्हर्सपैकी एकापर्यंत पोहोचणे शक्य झाले आणि त्यामुळेच हे अ‍ॅप प्रसिद्धीच्या वेळीही सक्रिय (फंक्शनल) होते व केवळ प्रोटोटाइप नव्हते, हे स्वतंत्रपणे पडताळून बघणेही शक्य झाले.

स्रोताने पुरवलेल्या प्राथमिक पुराव्याशिवाय, ‘द वायर’च्या टीमने अनेक ओपन-सोर्स अन्वेषण तंत्रांचा अवलंब करून, स्रोताने पुरवलेल्या अनेकविध सोशल मीडिया असेट्सचे, विस्तृत फोरेंन्सिक विश्लेषण केले आणि या अ‍ॅपच्या वापरासाठी आधारभूत नेटवर्क संरचनेची पुष्टी केली. टीमने आणखी काही स्वतंत्र तज्ज्ञांच्या तसेच या व्यापक ऑपरेशनमध्ये सहभागी कंपन्यांतील सध्याच्या कर्मचाऱ्यांच्याही मुलाखती घेतल्या व त्यायोगे या प्रकरणाच्या आणखी खोलात शिरण्याचा प्रयत्न केला.

या सर्व प्रक्रियेदरम्यान, पुराव्याचे प्राथमिक तुकडे एकसंध करणे ‘द वायर’ला शक्य झाले. त्याचप्रमाणे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत, जनमताचा विपर्यास करण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील घटक एकत्र येऊन, सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील संभाषणे ताब्यात घेऊन व बनावट प्रवाह निर्माण करून कसे व्यापक कुभांड रचू शकतात, हे जनतेपुढे आणण्यातही ‘द वायर’ला यश मिळाले आहे.

सोशल मीडियाचा विपर्यास करणाऱ्या
अ‍ॅपची चार धोकादायक फीचर्स

स्रोताने पुरवलेल्या, टेक फॉगच्या स्क्रीनकास्ट आणि स्क्रीनशॉट्समधून, अ‍ॅपची विविध फीचर्स प्रकाशात आली आणि त्यातून या अ‍ॅपचा दररोज वापर करणाऱ्या सायबर फौजांच्या कार्यात्मक रचनेबाबत माहिती मिळवण्यात टीमला मदत झाली. या सायबर फौजा, जनमताचा विपर्यास करणे, वेगळे मत व्यक्त करणाऱ्यांना त्रास देणे आणि भारतात पक्षपाती माहितीचे वातावरण कायमस्वरूपी निर्माण करणे, आदी उद्दिष्टांनी अ‍ॅपचा वापर करत असल्याचे यातून पुढे आले.

१ / जनमताला हवा तसा आकार देणे

या अ‍ॅपच्या प्रमुख कार्यांपैकी एक म्हणजे ट्विटरवरील ‘ट्रेण्डिंग सेक्शन’ आणि फेसबुकवरील ‘ट्रेण्ड’ अनधिकृतरित्या ताब्यात घेणे होय. या प्रक्रियेमध्ये अ‍ॅपच्या इन-बिल्ट ऑटोमेशन (स्वयंचलन) सुविधांचा वापर करून ट्विट्सचे ‘ऑटो-रिट्विट’ किंवा ‘ऑटो-शेअर’ केले जाते आणि व्यक्ती किंवा समूहांच्या पोस्ट्स तसेच स्पॅममधील हॅशटॅग्ज यांवर अ‍ॅप हाताळणारे नियंत्रण प्राप्त करू शकतात. 12

या फीचरचा वापर उजव्या विचारसरणीच्या प्रचारासाठीही केला जात आहे. या विचारसरणीचा प्रचार करणारा आशय (काँटेण्ट) प्लॅटफॉर्मवरील विस्तृत वर्गांपर्यंत पोहोचवला जातो, अतिरेकी कथने आणि राजकीय प्रचारमोहिमा प्रत्यक्षात जेवढ्या लोकप्रिय असतात, त्याहून खूप अधिक प्रमाणात लोकप्रिय भासवल्या जातात.

स्रोताने आधीच (अहेड ऑफ टाइम) पुरवलेल्या दोन ट्रेण्डिंग हॅशटॅग्जच्या प्लॅटफॉर्मवरील बनावट व शंकास्पद कृतींवर लक्ष ठेवून, ‘द वायर’ने या दाव्याची पडताळणी केली. हे दोन्ही हॅशटॅग्ज अनेक बॉटसदृश आणि शंकास्पद अकाउंट्सद्वारे बनावटरित्या फुगवले गेले आणि नंतर ते ‘ट्रेण्डिंग सेक्शन’मध्ये पोहोचले.

यातील #CongressAgainstLabourers हा हॅशटॅग स्रोताने ४ मे, २०२० रोजी संध्याकाळी ८:२५ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) वाजता, त्याच्या त्या दिवसाच्या ‘दैनंदिन कामां’च्या यादीचा भाग शेअर 3केला होता. स्क्रीनवरील माहितीनुसार, हा हॅशटॅग किमान ५५,००० ट्विट्समध्ये दिसेल असे काहीतरी करण्याचे व तो प्लॅटफॉर्मवरील ‘ट्रेण्डिंग सेक्शन’मध्ये पोहोचवण्याचे काम स्रोताला देण्यात आले होते.

मेल्टवेअर एक्स्प्लोअर या सोशल मीडिया विश्लेषण साधनाद्वारे, या हॅशटॅगच्या ऑन-प्लॅटफॉर्म अॅक्टिव्हिटीचे, विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणात असे दिसून आले की, हा हॅशटॅग ट्विटरवर दोन तासांपूर्वी प्रथम दिसला होता, त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास म्हणजेच स्रोताने स्क्रीन शेअर केल्यानंतर तो अर्ध्या तासात सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता. २००० ट्विट्सच्या घालून दिलेल्या जबाबदारीपलीकडे जात, हा ट्रेण्ड ५७,००० वेळा मेन्शन करण्यात आला होता. याशिवाय, स्रोताने काम ‘सक्रिय’ झाल्यानंतर, पहिल्या दोन तासात १,७०० अकाउंट्सचा वापर करत हा हॅशटॅग कसा पोस्ट केला हे स्क्रीनवर दिसत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता बरोबर १७०० अकाउंट्सद्वारे हा हॅशटॅग पोस्ट झाल्याचे दुसऱ्या एका स्वतंत्र विश्लेषणातून पुढे आले आणि स्रोताने दिलेल्या माहितीला पुष्टी मिळाली.

3

ही बनावट खाती इन-अ‍ॅप फीचर्स वापरून तयार करण्यात आली असे स्क्रीनशॉट्सवरून दिसत आहे. या फीचर्समुळे व्यक्तिगत ऑपरेटिव्ह्जना ‘तात्पुरते’ ईमेल अॅड्रेसेस निर्माण करता येतात, फोन नंबर्स सक्रिय करता येतात आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व टेलीग्राम यांनी स्थापित केलेल्या ईमेल व ओटीपी पडताळणीला, एपीआय निर्बंधांना वळसा घालून पुढे जाता येते. 45

अर्थात ही अ‍ॅपद्वारे निर्माण करण्यात आलेली ‘तात्पुरती’ अकाउंट्स होती की भाजपच्या खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्यांची किंवा अ‍ॅप ऑपरेटिव्ह्जची प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली तसेच नियोजित पोस्टिंग्जसाठी अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट करण्यात आलेली अकाउंट्स होती हे टीमला अद्याप पडताळून बघता आलेले नाही.

२ / ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सची चोरी

या अ‍ॅपद्वारे दिले जाणारे आणखी एक घातक फीचर म्हणजे अ‍ॅप हाताळणाऱ्या व्यक्तीला, नागरिकांची खासगी ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअ‍ॅप खाती ताब्यात घेण्याची व त्यावरून त्यांच्या ‘फिक्वेंटली कॉण्टॅक्टेड’ किंवा ‘ऑल कॉण्टॅक्ट्स’ क्रमांकांना संदेश पाठवण्याची मुभा मिळते. ‘टोकन थेफ्ट’ या तंत्राशी मिळतेजुळते तंत्र यासाठी वापरले जाते. 67अ‍ॅप ऑपरेटर्स या फीचरचा वापर करून लक्ष्यस्थानी असलेल्या वापरकर्त्याची व्यक्तिगत माहिती चोरून ती एका क्लाउडमधील राजकीय डेटाबेसमध्ये समाविष्ट करू शकतात. या डेटाबेसमध्ये सामान्य नागरिकांची नावे समाविष्ट झाल्यामुळे भविष्यकाळात त्रास देण्यासाठी किंवा ट्रोलिंगसाठी ही नावे वापरली जाण्याची शक्यताही वाढते.

व्हॉट्सअ‍ॅप चोरीचे प्रत्यक्षात (रिअल-टाइम) प्रात्यक्षिक दाखवण्यास स्रोताला सांगून ‘द वायर’ने या फीचरची पडताळणी केली. प्रस्तुत लेखकांनी एक कस्टम टेक्स्ट मेसेज पाठवल्यानंतर काही मिनिटांमध्ये स्रोताने टेक फॉगचा वापर करून लेखकांपैकी एकाचे ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअ‍ॅप खाते ताब्यात घेतले आणि त्या खात्याचा वापर करून त्याच्या ‘फ्रिक्वेंण्टली कॉण्टॅक्टेड’ क्रमांकांना हा कस्टम टेक्स्ट मेसेज पाठवला.

पहिल्या पाचही वापरकर्त्यांना (यात प्रस्तुत लेखाच्या दुसऱ्या लेखकाचा समावेश होता) कस्टम टेक्स्ट मेसेज मिळाला. याचा अर्थ विश्लेषणाच्या काळात या अ‍ॅपचे हे फीचर कार्यात्मक स्थितीत होते.

३ / नागरिकांचा खासगी डेटाबेस छळासाठी वापरणे

अ‍ॅपच्या स्क्रीनशॉट्स आणि स्क्रीनकास्ट्समध्ये नागरिकांचा एक विस्तृत व बहुआयामी क्लाउड डेटाबेस दिसून येतो. या नागरिकांचे वर्गीकरण त्यांचे व्यवसाय, भाषा, वय, लिंग, राजकीय विचारसरणी आणि अगदी शारीरिक वैशिष्ट्यांनुसार करण्यात आले आहे. या डेटाबेसमार्फत, व्यक्ती तसेच समूहांना ‘ऑटो-रिप्लाय’ पाठवण्याची मुभा अ‍ॅप ऑपरेटिव्ह्जना मिळते. गुगल शीट जोडून किंवा कीवर्ड्स व फ्रेजेस ऑटो जनरेट करून हे रिप्लाय केले गेले आहेत. यातील बहुतेक शिवीगाळ करणारे किंवा अपमानास्पद आहेत. 891011

लक्ष्य करण्यात आलेल्या समूहातील ‘महिला पत्रकारांना’ पाठवण्यात आलेल्या उत्तरांवर (रिप्लाय) लक्ष ठेवून ‘द वायर’ने या फीचरची पडताळणी केली. १ जानेवारी, २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या काळात टीमने सर्वाधिक ट्विटरवर सर्वाधिक रिट्विटेड स्त्री पत्रकारांना आलेल्या ४.६ दशलक्ष उत्तरांपैकी २८० उत्तरांचे विश्लेषण केले. त्यापैकी १८ टक्के (८०० हजारांहून अधिक रिप्लाय) हे टेक फॉग अ‍ॅपद्वारे व्यवस्थापित बनावट खात्यांवरून पाठवण्यात आले होते. अ‍ॅपच्या स्क्रीनशॉट्समध्ये दिसलेले अनेक अश्लाघ्य कीवर्ड्स या उत्तरांमध्येही दिसत होते. याचा अर्थ व्यक्तींचे वर्गीकरण वेगवेगळ्या वर्गांमध्ये केल्यामुळे ऑपरेटिव्ह्जना त्यांना अधिक टोकदारपणे लक्ष्य करण्यात मदत होते.

‘द वायर’ला जोडलेल्या कोणत्याही गुगल शीटपर्यंत पोहोचता आले नाही, कारण, अ‍ॅप ऑपरेटिव्ह्जकडे हे दस्तावेज संपादित करण्यासाठी किंवा बघण्यासाठी आवश्यक असलेली थेट लिंक दिली जात नाही. त्यांना केवळ अ‍ॅपवरील ऑटो-सजेस्टेड मेन्यूमधून उपलब्ध ‘इनपुट्स’ निवडता येतात. मात्र, कथने प्रसारित करण्यासाठी भाजप गुगल शीट्सचा वापर कसा करते याबद्दल ऑल्ट न्यूजने यापूर्वीच बातमी दिलेली आहे.

४ / मागमूस न ठेवण्याची ‘सुविधा’

या अ‍ॅपच्या स्क्रीन्सवरील सर्वांत महत्त्वाची सुविधा म्हणजे अ‍ॅप ऑपरेटिव्ह्ज एका क्षणात अस्तित्वात असलेली सर्व खाती डिलीट किंवा रिमॅप करू शकतात. या फीचरमुळे त्यांना त्यांच्या कामांचा सर्व पुरावा नष्ट करून टाकण्याची मुभा मिळते. 1213

अर्थात फीचरच्या याच स्वरूपामुळे, हा लेख प्रसिद्ध करण्याच्या वेळेस फीचर सक्रिय असेल किंवा नाही याची पडताळणी करणे ‘द वायर’ला शक्य झाले नाही.

कॉर्पोरेट-तंत्रज्ञान क्षेत्रांशी
हातमिळवणी

टेक फॉग अ‍ॅपच्या फीचर्सची पडताळणी केल्यानंतर टीमने जागल्यांना त्यांच्या एम्प्लॉयरविषयी माहिती पुरवण्याची विनंती केली. त्यांनी पाठवलेल्या खातेपत्रिका आणि वेतनपत्रिकांमध्ये आश्चर्यकारकरित्या दोन खासगी कंपन्यांची नावे आढळली. पर्सिस्टण्ट सिस्टम्स आणि मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची नावे अनुक्रमे त्यांचे ‘एम्प्लॉयर’ व ‘असाइन्ड क्लाएंट’ म्हणून आढळली.

पर्सिस्टण्ट सिस्टम्स ही १९९० मध्ये स्थापन करण्यात आलेली एक भारतीय-अमेरिकी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी (पब्लिकली ट्रेडेड) तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. तर मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेअरचॅट हा सोशल मीडियावरील भारतीय प्रादेशिक भाषांचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म चालवते. याला ट्विटरद्वारे निधीपुरवठा केला जातो.

पर्सिस्टण्ट कंपनीने आपल्याला ‘सोशल मीडिया इनचार्ज’ म्हणून कंपनीच्या नागपूर कॉर्पोरेट कार्यालयात नोकरी दिली होती, असे स्रोताने सांगितले. मात्र, टेक फॉग अ‍ॅप ऑपरेट करण्याच्या सध्याच्या प्रकल्पामध्ये शेअरचॅटच्या सहयोगाने काम करावे लागते आणि त्यांचा सुपरवायजर देवांग दवे होता, असे स्रोताने सांगितले. दवे भाजयुमोच्या सोशल मीडिया व आयटी विभागाचे प्रमुख होते. सध्या ते भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. दवे यांच्या थेट पर्यवेक्षणात्मक भूमिकेची पुष्टी ‘द वायर’ थेटपणे करू शकले नाही पण आमच्या तंत्रज्ञानात्मक विश्लेषणात व्यापक संबंधांची पुष्टी झाली आहे.

पर्सिस्टण्ट सिस्टम्सचा टेक फॉगशी संबंध

पर्सिस्टण्ट सिस्टम्स ही तंत्रज्ञान सेवा कंपनी असून, २०१५ सालापासून या कंपनीने सरकारी कंत्राटे संपादित करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये हिंदू बिझनेसलाइनला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे तत्कालीन कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष (सेवा) मृत्युंजय सिंग यांनी असा दावा केला होता की, कंपनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी, सरकारद्वारे माहिती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या खर्चाबाबत, ‘आक्रमक व उत्साही’ आहे. त्यानंतर त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने, १० भारतीय राज्यांमधील आरोग्यविषयक माहितीची नोंद करणे, ती साठवणे व त्यावर प्रक्रिया करणे, या उद्देशाने डिजिटल हब उभारण्यासाठी पर्सिस्टण्ट सिस्टम्सची निवड केली.

‘द वायर’ने पर्सिस्टण्ट सिस्टम्समध्ये सध्या काम करणाऱ्या एका स्वतंत्र स्रोतापर्यंत पोहोचून टेक फॉग ऑपरेशन्समधील कंपनीच्या भूमिकेचा तपास केला. या स्रोताने कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट शेअरपॉइंटचे (अंतर्गत सहयोग साधन) स्क्रीनशॉट्स शेअर केले. यामध्ये ‘टेक फॉग’ या सर्च टर्मद्वारे सुमारे १७,००० असेट्स आयडेंटिफाय झाली. यातूनही अ‍ॅपच्या सक्रियतेची स्पष्ट ग्वाही मिळते.

या असेट्समध्ये, अ‍ॅपच्या वेगवेगळ्या स्तरांच्या विकासाबद्दल माहिती देणारे, तांत्रिक दस्तावेज आहेत. यांत ट्विटर व व्हॉट्सअ‍ॅपचे एकात्मीकरण, गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली डेटा इनपुट टूल्स, पेटीएममार्फत राबवली जाणारी पेमेंट संरचना आणि टास्कर या संदेश पाठवण्यासारख्या विशिष्ट कृतींना चालना देणाऱ्या अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून करण्यात आलेले ऑटोमेशन आदींचा समावेश होतो. हे ऑटोमेशन वापरकर्त्याचे लोकेशन, वेळ, तारीख, घटना आणि हावभाव यांच्या ‘संदर्भांच्या आधारे’ करण्यात आले आहे. 1415

‘द वायर’ने पर्सिस्टण्ट सिस्टम्सशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला. मात्र, त्यांच्यातर्फे याबाबत काही बोलण्यास नकार देण्यात आला.

द्वेषपूर्ण भाषणे पेरण्यासाठी शेअरचॅटचा वापर

मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे फ्लॅगशिप उत्पादन असलेल्या शेअरचॅटचा वापर, अ‍ॅप ऑपरेटिव्ह्जद्वारे, बनावट बातम्या, राजकीय प्रचार व द्वेषपूर्ण भाषणे तयार करणे व ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यापूर्वी त्यांची चाचणी घेणे यांसाठी केला जात होता, असा दावा स्रोताने केला आहे.

भारतातील पहिल्या क्रमांकाचे सोशल मीडिया अ‍ॅप म्हणून ज्याचे मार्केटिंग केले जाते त्या शेअरचॅट अ‍ॅपवर हजारो लक्ष्यीकृत प्रादेशिक समुदाय आहेत. या समुदायांद्वारे लक्षावधी वापरकर्ते पोस्ट्स, बातम्या, फोटो, मीम्स आणि व्हिडिओज आपल्या स्थानिक भाषेत शेअर करू शकतात. हे अ‍ॅप दोन मार्गांनी वापरले जाते. वापरकर्ते अकाउंट्स फॉलो करू शकतात, अन्य वापरकर्त्यांना संदेश पाठवू शकतात, असे सोशल नेटवर्क म्हणून याचा वापर केला जातो. तसेच लोक आपला काँटेण्ट अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू शकतात, असा खुला ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म म्हणूनही ते वापरले जाते.

शेअरचॅट १४ स्थानिक भाषांना अनुकूल आहे आणि भारतातील इंग्रजी भाषेचा वापर न करणाऱ्या, प्रामुख्याने श्रेणी-२ व श्रेणी-३ शहरांतील वर्गांसाठी अतिस्थानिक काँटेण्टवर भर देते. भारतात १६० दशलक्ष वापरकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीने एप्रिल २०२१ मध्ये टायगर ग्लोबल, स्नॅप आणि ट्विटरसारख्या काही आधीपासून अस्तित्वात असलेल्या गुंतवणूकदारांमार्फत ५०२ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला. तसेच जुलै २०२१ मध्ये झालेल्या नवीन निधीउभारणी फेरीत कंपनीने १४५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला. त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन आता सुमारे ३ अब्ज डॉलर्स झाले आहे.

ही कंपनी बनावट बातम्या आणि द्वेषपूर्ण भाषणांनी ग्रासलेली आहे आणि यातील अनेक समुदाय चुकीची माहिती व राजकीय प्रचाराने भरलेले आहेत अशा स्वरूपाचे वृत्त, २०१८ मध्ये, हिंदुस्तान टाइम्सने दिले होते. त्याच वर्षी ‘द केन’ने फर्मच्या खासगीत्वाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. या धोरणानुसार, जाहिरातदार व व्यवसाय भागीदारांना वापरकर्त्यांची संपर्क यादी, स्थळाचा डेटा तसेच उपकरणाचे तपशील उपलब्ध करून दिले जातात, वापरकर्त्याच्या फोनवर इन्स्टॉल केलेल्या अन्य अ‍ॅप्सची माहितीही दिली जाते, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एक वर्षाने इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, कंपनीने प्लॅटफॉर्मच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, पाचेक लाख अकाउंट्सवरील ४,८७,००० पोस्ट्स डिलिट करून टाकल्या.

उत्तरप्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान, शेअरचॅटचे प्रोडक्ट लीड अंकूर श्रीवास्तव यांनी, राजकीय पक्षांना सोशल मीडियाकडे आकर्षित करून घेण्यासाठी कंपनीने केलेल्या उपायांवर प्रकाश टाकणारी एक पोस्ट पब्लिश केली होती. यांमध्ये उत्तरप्रदेश निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची लोकप्रियता वाढावी या उद्देशाने, प्रादेशिक पक्षांसाठी विशेष समुदाय व टॅग्ज तयार करण्याचा समावेश होता. त्यानंतर एक वर्षाने मनीकंट्रोल नावाच्या स्थानिक नियतकालिकाने एक लेख प्रसिद्ध केला. यामध्ये अनेक प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक भाषेतील प्लॅटफॉर्म्सवर कशा पद्धतीने प्रोफाइल्स तयार केली आहेत आणि त्या योगे हे पक्ष प्रामुख्याने प्रादेशिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसा प्रयत्न करत आहेत यावर प्रकाश टाकण्यात आला होता.

आपल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी तसेच अ‍ॅपच्या व्यापक ऑपरेशनमधील प्लॅटफॉर्मच्या संबंधाबाबत माहिती पुरवण्यासाठी जागल्याने टेक फॉगमार्फत नियंत्रित केल्या जाणाऱ्या १४ अकाउंट्सची यादी दिली. यातील प्रत्येक अकाउंट शेअरचॅटवरील अकाउंटशी जोडलेले होते. 1617

या अकाउंट्सद्वारे शेअरचॅटवर तसेच ट्विटर/फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्ट्सवर ‘द वायर’ने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० या ३० दिवसांच्या काळात बारीक लक्ष ठेवले. या अकाउंट्सद्वारे शेअरचॅटवर करण्यात आलेल्या पोस्ट्स आणि त्याच अकाउंट्सद्वारे फेसबुक/ट्विटरवर करण्यात आलेल्या पोस्ट्स यांच्यात तुलना करणाऱ्या एका स्क्रिप्टमधून असे दिसून आले की, यातील ९० टक्के पोस्ट्स विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकण्यात आलेल्या आहेत. या पोस्ट्सवरील वेळेचे शिक्के तपासले असता असे लक्षात आले की, सर्वत्र आढळणाऱ्या पोस्ट्स प्रथम शेअरचॅटवर टाकण्यात आल्या आहेत आणि तेथून त्या ट्विटर किंवा फेसबुकवर गेल्या आहेत.

हा वर्तन नमुना टेक फॉगच्या बनावट खात्यांच्या व्यापक नेटवर्कमध्येही दिसून येतो का, हे निश्चित करण्यासाठी आम्ही शेअरचॅटवरील लोकप्रिय ‘हिंदी’ व ‘मराठी’ ट्रेण्डिंग समुदायांवर अपलोड झालेल्या तसेच सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असलेल्या ३.८ दशलक्ष पोस्ट्सचे विश्लेषण केले. शेअरचॅटवरील वेगवेगळे समुदाय आणि ट्विटरच्या ‘लिस्ट्स’ व फेसबुकचे ‘ग्रुप्स’ यांसारखे अन्य सार्वजनिकरित्या उपलब्ध मुख्य प्रवाहातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने, हा डेटासंच नेटवर्क आलेखावर, ग्राफिस्ट्री या व्हिज्युअलायझेशन सॉफ्टवेअरद्वारे मॅप करण्यात आला.

या आलेखात असे दिसून आले की, शेअरचॅटवरील लोकप्रिय मराठी समुदायांवर अपलोड झालेला ८७ टक्के काँटेण्ट आणि हिंदी समुदायांवर अपलोड झालेला ७९ टक्के काँटेण्ट, त्यानंतर, राजकीय समुदायांवर आधारित ‘ट्रेण्डिंग’मध्ये सहभागी अकाउंट्सद्वारे, मुख्य प्रवाहातील सोशल मीडियावर, शेअर करण्यात आला. 18

नंतर या सगळ्या पोस्ट्स भावनिक व भाषिक सूर (टोन) निश्चित करण्यासाठी, आयबीएम वॉटसन टोन अॅनालायजर या नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टूलमध्ये फीड करण्यात आला. अनेकविध डीप लर्निंग एआय मॉडेल्सचा वापर करून, आम्ही या पोस्ट्सचे वेगवेगळ्या भावनिक व स्वराधारित वर्गांमध्ये वर्गीकरण केले. शेअर करण्यात आलेल्या काँटेण्टमध्ये भावनिक द्वेष आहे की नाही, असल्यास या द्वेषाचा निर्देश कोणाकडे, म्हणजेच कोणत्या लिंगाकडे, धर्माकडे, विकलांगतेकडे, वंशाकडे, जातीकडे आणि लैंगिक प्रवृत्तीकडे आहे यावर प्रकाश टाकण्यात याची मदत झाली. या तंत्राचा वापर करून सर्व पोस्ट्सचे चार विभागांत वर्गीकरण करण्यात आले: वंशभेद, लिंगभेद, जातिभेद किंवा यापैकी काहीही नाही अशा चार विभागांत पोस्ट्सचे वर्गीकरण करण्यात आले. पहिल्या तीन विभागांमध्ये ९० टक्के आत्मविश्वासासह पडणाऱ्या पोस्ट्सना द्वेषपूर्ण भाष्य असे लेबल लावण्यात आले. या मॉडेलद्वारे तपासण्यात आलेल्या एकूण ३.८ दशलक्ष पोस्ट्सपैकी सुमारे ५८ टक्के (२.२ दशलक्ष) पोस्ट्स ‘द्वेषपूर्ण भाष्य’ असे लेबल लावले जाऊ शकेल अशा होत्या. अमेझॉन वेब सर्व्हिसेसद्वारे पुरवले जाणारे कॉम्प्रिहेण्ड हे आणखी एक एनएलपी टूल वापरून या निष्कर्षाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आली.

‘द वायर’ ने या प्रकरणात प्रतिक्रिया प्राप्त करण्यासाठी शेअरचॅटच्या ग्रिव्हन्सेस ऑफिसरशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला व अंतर्गत तपासासाठी आपल्याला थोडा अवधी लागेल असे सांगितले.

सगळे एका सूत्रात
बांधणाऱ्या नोंदी

टेक फॉग ऑपरेशन आणि भाजयुमो यांच्यातील संबंध अधिक चांगला समजावा म्हणून स्रोताने प्रस्तुत लेखकांना ईमेलद्वारे सध्याच्या एका भाजयुमो कार्यकारिणी सदस्याशी जोडून दिले. या व्यक्तीने आम्हाला त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीद्वारे एक कोड स्क्रिप्ट पाठवले. टेक फॉग अ‍ॅप होस्ट करणाऱ्या संरक्षित सर्व्हरशी जोडलेल्या अनेक बाहेरच्या वेबसाइट्स व टूल्स ओळखण्यासाठी आम्हाला कोड स्क्रिप्टचा उपयोग झाला.

पायथॉन लँग्वेजमध्ये लिहिलेला नेटवर्क प्रोफायलर कोड, टेक फॉग सर्व्हरची रिअल-टाइम नेटवर्क अॅक्टिव्हिटी दाखवतो, सर्व्हरद्वारे पाठवण्यात आलेला डेटा आणि हे अ‍ॅप अक्सेस करणाऱ्या सर्व वेबसाइट्स व सेवांची यादीही यात दिसते. भाजयुमो कार्यकारिणी सदस्याने हा कोड एक्झिक्युट केला, त्यावर १ फेब्रुवारी, २०२०, संध्याकाळचे ६:४६ (जीएमटी) असा टाइमस्टॅम्प मारला. हे केल्यामुळे टेक फॉगच्या, पर्सिस्टण्ट सिस्टम्सद्वारे व्यवस्थापित, काँटेण्ट डिलिव्हरी नेटवर्क होस्ट करण्यात आलेला अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ‘अनलॉक’ झाला. या कोडने अंगभूत सुरक्षा प्रणालीला बायपास केले आणि त्या विशिष्ट दिवशी टेक फॉग अक्सेस करणाऱ्या वेबसाइट व सर्व्हिसेसच्या यादीची पुनरावृत्ती केली. 19

‘द वायर’ने स्क्रिप्टच्या अस्सलतेची पुष्टी करण्यासाठी तिचे त्रयस्थ तज्ज्ञाकडून परीक्षण करून घेतले. ही तज्ज्ञ व्यक्ती सध्या मायक्रोसॉफ्टमध्ये प्रमुख सॉफ्टवेअर आर्किटेक्ट या पदावर काम करत आहे. मूळ स्क्रिप्टमधून गहाळ झालेल्या काही लायब्ररीज शोधून काढण्यात त्रयस्थ तज्ज्ञांना यश मिळाले. या प्रामुख्याने जीव्हेण्ट या पायथॉनवर आधारित नेटवर्किंग लायब्ररीज होत्या आणि त्यांच्या स्थानिक कम्प्युटरवरील स्क्रिप्टवर त्या चालत होत्या. हे स्क्रिप्ट म्हणजे त्यांचा स्थानिक सर्व्हर अक्सेस करणाऱ्या सर्व वेबसाइट्स व सर्व्हिसेसची यादी तयार करणारा ‘इनबाउंड नेटवर्क प्रोफायलर’ आहे यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले.

आयरिस या सर्व्हिसेसची ओळख उघड करणाऱ्या यूआरएल्सवरील डीएनएस सर्च उलट्या बाजूने करण्यासाठी, टीमने, डोमेन टूल्सच्या थ्रेट इंटलिजन्स प्लॅटफॉर्मचाही वापर केला. 2021

प्रथम ओळख पटवण्यात आलेल्या यूआरएल्सपैकी एक होता metabase.sharechat.com. याचा अर्थ शेअरचॅटचा टेक फॉग ऑपरेशनमधील थेट सहभाग यातून स्पष्ट होतो. यातील काही उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी वापरली जाणारी लोकप्रिय व्यवसाय साधने (गुगल डॉक्स आणि शीट्स, झोहो) आहेत. ऑटोमेशन (झेपियर, टास्कर) आणि अॅनालिटिक्स (ग्राफाना, गुगल अॅनालिटिक्स) यांसाठी वापरली जाणारी साधने आहेत. अन्य मात्र प्रस्थापनापूर्व हिंदी आणि इंग्रजी वेबसाइट्स व वृत्तवाहिन्यांना जोडलेले आहेत. यांमध्ये रिपब्लिकन वर्ल्ड, ऑपइंडिया, एबीपी न्यूज आणि दैनिक जागरण यांचा समावेश होतो. देशामध्ये पक्षपाती माहितीची परिसंस्था भक्कम करण्यात भाजपला मदत करणाऱ्या विशिष्ट डिजिटल माध्यमांबाबत यामुळे प्रश्न उपस्थित होतात.

उर्वरित यूआरएलही टेक फॉगच्या व्यापक तपासातील अविभाज्य अंगांची पुष्टी करतात. भाजयुमोचा देवांग दवे यांच्यामार्फत यात असलेला सहभाग यातून स्पष्ट होतो, कारण, टेक फॉग अक्सेस करणारे '172.104.48.129' आणि '103.53.43.161' हे दोन यूआरएल ए रेकॉर्डनुसार (अॅडरेस मॅपिंग रेकॉर्ड) अनुक्रमे भाजयुमोची वेबसाइट आणि दवे यांच्याद्वारे व्यवस्थापित isupportnamo.org या वेबसाइटकडे घेऊन जातात.

दवे यांनी हे सर्व आरोप ईमेलद्वारे फेटाळले आहेत. त्यांच्या मते, भाजयुमो किंवा isupportnamo (आयसपोर्टनमो) सर्व्हर्सचा अशा कोणत्या अ‍ॅपशी संबंध असल्याचे त्यांच्या टीमला आढळलेले नाही. ‘आपल्या टीममधील कोणत्याही सदस्याचा अशा कोणत्या अ‍ॅपशी संबंध नाही किंवा अशा अ‍ॅपशी संबंध असलेल्या कोणाशीही आपल्या टीमचा संबंध नाही,’ असा दावा दवे यांनी केला.

अर्थात ए रेकॉर्डमध्ये बदल करण्यासाठी सर्व्हर अक्सेस करणे गरजेचे असते या किमान तांत्रिक समजुतीशी हे विसंगत आहे. टेक फॉग हे खुला एपीआय नसलेले खासगी अ‍ॅप असल्यामुळे डेटा व संसाधने शेअर करण्यासाठी अ‍ॅप्समध्ये येणाऱ्या संबधांमध्ये या कंपन्यांत काम करणारे कर्मचारी हस्तक्षेप करत असतील अशी शक्यता खूपच कमी आहे.

संशयात भर पाडणारी बाब म्हणजे दवे यांनी ‘द वायर’च्या प्रश्नांना उत्तरे पाठवली, त्याच्या एक तास आधी मूळ जागल्याच्या ट्विटर अकाउंटचा ताबा घेतला गेला. यूजरनेम @AarthiSharma08 होते, ते बदलून @AarthiSharma8 असे करण्यात आले. या अकाउंटच्या जुन्या ट्विटच्या यूआरएलवर गेले असता तिथून नवीन यूजरनेमला रिडायरेक्ट केले जाऊ लागले. या यूआरएलला भेट देऊन कोणीही स्वतंत्रपणे याची पडताळणी करू शकेल.

या बदलामागील कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत लेखकांनी स्रोताशी संपर्क केला, तेव्हा त्याने त्याचे अकाउंट हॅक झाल्याचे खात्रीने सांगितले. त्याच्या या अकाउंटला जोडलेले ईमेल्स व पासवर्ड बदलण्यात आल्याचे त्याने सांगितले. ट्विटरने पाठवलेल्या, अकाउंट हॅक झाल्याचा इशारा देणाऱ्या, सुरक्षा ईमेलचा स्क्रीनशॉट स्रोताने प्रस्तुत लेखकांना पाठवला आहे. 22

टेक फॉग सर्व्हर
लोकेट करणे

या कोड्याचा अखेरचा भाग होता तो म्हणजे टेक फॉग अ‍ॅप लोकेट करणे व त्याची कॉपी अर्काइव्ह करणे. हे साध्य करण्यासाठी टीमने भाजयुमोच्या स्रोताच्या दाव्याची पडताळणी सुरू केली. स्रोताच्या दाव्यानुसार स्क्रिप्ट आउटपुटमधील '172.67.154.90' आणि '104.21.80.213' हे दोन यूआरएल म्हणजे स्वत:च अ‍ॅपचे होस्टिंग करणारे जिओ-रेप्लिकेटेड सर्व्हर्स आहेत.

जिओ-रेप्लिकेशन हे सिस्टम डिझाइनचे एक प्रारूप असते. यामध्ये सेवेची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी तोच अ‍ॅप डेटा सर्व्हर्सवर एकमेकांपासून दूर दूर असलेल्या अनेक प्रत्यक्ष (फिजिकल) स्थळांवर साठवला जातो. डेटा अनेक सर्व्हर्सवर विखरून ठेवण्यासाठीही हे सिस्टम डिझाइन वापरले जाते. यामुळे अ‍ॅप्लिकेशनचा सर्व डेटा एकाच ठिकाणी साठवून ठेवणाऱ्या ‘मास्टर सर्व्हर’वरील डेटाच्या तुलनेत डेटावर लक्ष ठेवणे व त्याचा माग ठेवणे कठीण होते.

‘द वायर’ने दाव्याच्या अस्सलतेची पडताळणी करण्याच्या दृष्टीने, दोन्ही यूआरएल्सवर लक्ष ठेवण्यासाठी व ते वेब अर्काइव्ह करण्यासाठी ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी एक सर्व्हर क्रिएट केला. चार महिन्यानंतर १ जून २०२१ रोजी रात्री १२ वाजता '172.67.154.90' सर्व्हरने टेक फॉग अ‍ॅपची लॉगइन स्क्रीन 23डिसप्ले केली आणि डिफॉल्ट ‘अक्सेस डिनाइड’ 24 वर परत जाण्यापूर्वी २४ तास म्हणजेच २ जून, २०२१च्या रात्री १२ वाजेपर्यंत हे अ‍ॅप लाइव्ह होते. मूळ जागल्याने ‘द वायर’च्या टीमला अगदी सुरुवातीला दिलेल्या अ‍ॅप स्क्रीनशॉट्सशी ही लॉगइन स्क्रीन मिळतीजुळती होती. हा जागल्या नागपूरमधील कार्यालयात अ‍ॅप ऑपरेटर म्हणून काम करत होता. हे पुरावे जुळल्यामुळे आम्हाला या शोधमोहिमेच्या अस्सलतेबद्दल आत्मविश्वास वाटू लागला आणि टेक फॉग हे लाइव्ह अ‍ॅप आहे हे सिद्ध करणारा तांत्रिक पुरावा हाती लागला, तेव्हा आम्ही सैद्धांतिक टप्प्याच्या पुढे गेलो आहोत अशी खात्री पटली.

अजून पल्ला
लांबच

या ऑपरेशनमागील विचारसरणीचे स्वरूप बघता, पर्सिस्टण्ट सिस्टम्स आणि मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड यांचा भाजपच्या संघटित सोशल मीडिया फसवणुकीतील सहभागामागील खरा हेतू अद्याप पुरेसा स्पष्ट झालेला नाही. अर्थात चीन आणि उत्तर कोरियासारख्या निरंकुश व हुकूमशाही सत्तांमध्ये, डिजिटल प्रणालींचा उपयोग ज्या संशयास्पद पद्धतीने होत आला आहे, तसाच तो जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे बिरुद मिरवणाऱ्या देशातही होत आहे आणि त्यात खासगी क्षेत्र सहभागी आहे याचा आजपर्यंत कधी नव्हता एवढा स्पष्ट पुरावा हाती आला आहे. टेक फॉग ऑपरेशनचे प्रमाण, अत्याधुनिकता आणि व्याप्ती यांवरून हे दिसून येते.

टेक फॉग अन्वेषणाचा भाग असलेल्या नंतरच्या वृत्तांतांमधून ‘द वायर’ या छुप्या अ‍ॅपमागील तंत्रज्ञान उलगडून बघेल तसेच सत्ताधारी पक्षाच्या राजकीय यंत्रणांनी या अ‍ॅपच्या, संघटित सोशल मीडिया विपर्यास क्षमतेचा वापर, सीएएविरोधातील चळवळ, दिल्ली दंगली आणि देशात पसरलेली कोविड-१९ साथ या राष्ट्रीय घटनांच्या अनुषंगाने कसा केला असेल याचा धांडोळाही घेतला जाईल.

टीप: जर तुम्ही पर्सिस्टण्ट सिस्टम्स, शेअरचॅट किंवा भाजयुमोमध्ये काम करत असाल आणि टेक फॉग अ‍ॅपबद्दल तसेच त्याचा वापर करणाऱ्या व्यापक ऑपरेशनविषयी तुम्हाला माहिती असेल, तर कृपया आमच्याशी tekfog@protonmail.com या पत्त्यावर संपर्क साधा. तुमचे नाव गोपनीय राहील व खासगी बाबी उघड होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ.

आयुष्मान कौल हे दक्षिण आशिया कव्हर करणारे स्वतंत्र संरक्षण व इंटेलिजन्स अॅनालिस्ट आहेत.

देवेश कुमार हे ‘द वायर’मधील स्वतंत्र डेटा अॅनालिस्ट व वरिष्ठ डेटा व्हिज्युअलायझर आहेत.